Join us

खोतकरांचे बंड मातोश्रीवर थंड, ठाकरेंच्या भेटीनंंतर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 5:22 AM

लोकसभेच्या जालना जागेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील, तो आदेश माझ्यासाठी अंतिम असेल, असे जालनाचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.

मुंबई : लोकसभेच्या जालना जागेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील, तो आदेश माझ्यासाठी अंतिम असेल, असे जालनाचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. खोतकर यांचे हे वक्तव्य लक्षात घेता, त्यांची आणि दानवे यांची दिलजमाई होईल, असे मानले जात आहे.भाजपा-शिवसेना युतीमध्ये जालनाची जागा भाजपाचे विद्यमान खासदार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे लढविणार असले, तरीही मी निवडणूक लढेन आणि त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका खोतकर यांनी घेतली होती. त्यामुळे खोतकर हे काँग्रेसकडून निवडणूक लढतील, अशी चर्चाही होती. तथापि, दोन दिवसांपूर्वी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, जालनात जाऊन दानवे-खोतकर यांच्याशी बंदद्वार चर्चा करून दिलजमाईचे प्रयत्न केले होत. त्यातच खोतकर यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दानवेंबाबत तुमच्या काय तक्रारी आहेत, त्या मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर नक्कीच घालेन, पण आता भांडत बसण्याऐवजी युतीला विजयी करणे आवश्यक आहे, या शब्दांत ठाकरे यांनी खोतकर यांना समजाविल्याचे समजते.

टॅग्स :अर्जुन खोतकर