जाहिराती, मोबाईल टाँवर्स, व्यावसायिक वापराचे पर्याय
मुंबई : केवळ तिकीटांच्या माध्यमातून मेट्रो रेल्वेच्या संचलनाचा डोलारा पेलणे एमएमआरडीएशी संलग्न असलेल्या मुंबई महा मेट्रोला अशक्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी कार्यान्वीत होणा-या अंधेरी ते दहिसर (मेट्रो ७) आणि दहिसर ते डीएननगरर (२ अ) या मार्गावरील मेट्रो प्रकल्पांसाठी पर्यायी उत्पन्नाच्या स्त्रोत उभे केले जाणार आहेत. या स्त्रोतांच्या माध्यमातून किती आणि कसा महसूल प्राप्त होईल याची चाचपणी एमएमआरडीए सुरू करणार असल्याची माहिती हाती आली आहे.
मेट्रो रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांसाठी प्रवासी भाडे मर्यादीत ठेवावे लागते. त्यामुळे केवळ तिकीट विक्रीच्या जोरावर ही वाहतूक सेवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मेट्रो रेल्वे धोरणाचा स्वीकार करताना पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्याची मुभा प्राधिकरणांना दिलेली आहे. तसेच, राज्य सरकारने १७ आँक्टोबर, २०१५ रोजी शासन निर्णयाव्दारे तशी परवानगी एमएमआरडीएला दिली आहे. वर्सोवा अंधेरी दहिसर या मार्गावरील मेट्रो २०१४ सालापासून सुरू झाली असून डिसेंबर, २०२० पर्यंत अंधेरी दहिसर (मेट्रो ७) आणि दहिसर डीएननगरर (२ अ) या मार्गावर मेट्रो धावेल असा अंदाज होता. मात्र, कोरोनामुळे तो मुहूर्त लांवणीवर पडला आहे. मात्र, या दोन मार्गांवर अन्य स्त्रोतांच्या माध्यमातून महसूल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू झाला असून त्यासाठी एमएमआरडीए लवकरच सल्लागार नियुक्त करणार आहे.
जाहिराती, मेट्रो स्टेशन आणि मार्गिकांवरील जागांचा व्यावसायिक वापर, ट्रान्झिट ओरिएटेड डेव्हलपमेंट (टीओडी), डिजीटल मार्केटींग अशा विविध आघाड्यांव पर्यायी स्त्रोत शोधण्याची परवानगी आहे. त्यानुसार. मेट्रोचे कोच, अंतर्गत व्यवस्था, स्टेशन आणि त्या भोवतालचा परिसरातील जाहिरातींच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळू शकेल, त्या भागामध्ये टेलिकाँम टाँवर्स उभारणी आणि आँप्टीकल फायबरचे नेटवर्कचे जाळे विस्तारणे शक्य आहे का, एटीएम किंवा छोट्या व्यावसायिक अस्थापनांना जागा भाडे तत्वावर देणे शक्य होईल का अशा विविध आघाड्यांवर हे सल्लागार आपला सहा महिन्यांत अहवाल तयार करतील. त्यानंतर या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठीसुध्दा त्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. या मार्गिकांवरील पर्याय स्त्रोतांच्या माध्यमातून नेमके किती उत्पन्न मिळेल हे सल्लागारांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळू शकेल अशी माहिती एमएमआरडीएतल्या अधिका-यांनी दिली.