दिव्यात संतप्त प्रवाशांचा स्फोट!

By admin | Published: January 3, 2015 02:56 AM2015-01-03T02:56:02+5:302015-01-03T02:56:02+5:30

मध्य रेल्वेला नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी प्रवाशांनी दिव्यात तब्बल सहा तास रोखून धरले. संतप्त प्रवाशांनी रेल रोको करीत दगडफेक केली.

An explosion of angry passengers! | दिव्यात संतप्त प्रवाशांचा स्फोट!

दिव्यात संतप्त प्रवाशांचा स्फोट!

Next

डोंबिवली : पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकण्याची घटना नेहमीचीच, पण शुक्रवारी सकाळी याच घटनेने प्रवाशांच्या संतापाचा स्फोट झाला आणि नेहमीची वैतागवाडी ठरलेल्या मध्य रेल्वेला नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी प्रवाशांनी दिव्यात तब्बल सहा तास रोखून धरले. संतप्त प्रवाशांनी रेल रोको करीत दगडफेक केली. चार वाहनांची जाळपोळ केली. ‘मरे’च्या चारही मार्गांवरील वाहतुकीचा बोजवारा उडालाच, शिवाय यात दोन मोटरमन आणि सुरक्षा विभागाच्या सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांसह काही जण जखमी झाले. दुपारी १२ नंतर हळूहळू वाहतूक सुरू झाली. मात्र नोकरी-व्यवसायासाठी निघालेल्या प्रवाशांनी संध्याकाळपर्यंत ‘मरे’वरील जवळपास सर्वच स्थानके तुडुंब भरली होती.
कल्याण-ठाकुर्ली अप धीम्या मार्गावर शुक्रवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास बदलापूर येथून निघालेल्या एका लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. या घटनेमुळे चारही मार्गांवरील वाहतूक बाधित झाली. हा बिघाड दुरुस्त करून मध्य रेल्वेने सीएसटीच्या दिशेने जलद मार्गावरून गाड्या सोडल्या. परंतु जलद मार्गासाठी प्लॅटफॉर्मच नसल्याने या गाड्यांना कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा या मार्गावर थांबा नव्हता. परिणामी दिव्यातील प्रवाशांनी दिवा-सीएसटी गाडी सोडा, अशी मागणी स्थानक प्रशासनाकडे केली, मात्र पोलीस दलाने या जमावावर लाठीचार्ज केला. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी जलद अपचा मार्ग अडवला आणि दगडफेक सुरू केली. प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांचे कार्यालय, इंडिकेटर्स, स्वच्छतागृह अशी सर्वत्र दगडफेक केली. सात एटीव्हीएम आणि बुकिंग आॅफीसची तोडफोड केली, तर सहा एटीव्हीएम रेल्वे ट्रॅकमध्ये टाकल्या. त्यामुळे डोंबिवलीहून-सीएसटी जलद मार्गावरील वाहतूकही खोळंबली. डोंबिवलीतही जमावाने दोन तिकीट खिडक्यांचे नुकसान केले. सकाळी साडेदहानंतर पुन्हा एकदा प्रवाशांना सुरक्षारक्षकांनी लाठीमार केला. त्यानंतर पुन्हा प्रवासी खवळले. फलाट क्रमांक १, २, ५, ६ च्या दिशेने तसेच लोकलवर दगडफेक झाल्याने महिला, विद्यार्थ्यांची प्रशासनाची धावपळ झाली.
रेल्वे कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे संतप्त मोटरमन लॉबीनेही लोकल न चालवण्याचा निर्णय घेत सीएसटीत निदर्शने केली. त्यामुळे हार्बर मार्गही बंद पडला. मोटरमन्सना तातडीने सुरक्षा देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने मुंबईची लाईफलाइन पुन्हा सुरू झाली.

च्स्थानक प्रबंधकांचे कार्यालय, इंडिकेटर्स, स्वच्छतागृह यासह जे मिळेल त्यावर दगडफेक झाल्याने स्थानकाची प्रचंड नासधूस केली.
च्दोन पोलीस व्हॅन, एक अन्य वाहन जाळून टाकले. तर अन्य एका जीपचे नुकसान करण्यात आले
च्स्थानकातील ७ एटीव्हीएम (आॅल टाइम तिकीट व्हेंडिंग मशिन), बुकिंग आॅफीसमधील आदीची तोडफोड केली.
च्डोंबिवलीत जमावाने पश्चिमेकडील कल्याण दिशेच्या तिकीट घराजवळील २ तिकीट खिडक्यांचे नुकसान केले, तर ६ एटीव्हीएम रेल्वे ट्रॅकमध्ये टाकली.

गाऱ्हाणे रेल्वेमंत्र्यांपर्यंत
दिवा-सीएसटी लोकल सुरू व्हावी, यासाठी प्रभू यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच तोडगा निघणार असून, त्यासाठी त्यांनी ९ जानेवारी रोजी ठाण्यात बैठक घेण्याचे सांगितले आहे.
- आमदार एकनाथ शिंदे,
पालकमंत्री, ठाणे जिल्हा

 

Web Title: An explosion of angry passengers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.