लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : दिघा येथील सुभाषनगर वसाहतीत महावितरणच्या भूमिगत विद्युत केबलचा स्फोट झाल्याने एक चार वर्षांचा मुलगा आणि एक युवक जखमी झाला. घटनेमुळे परिसरातील महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. घणसोली परिसरात नेहमीच दोन दिवसाआड विजेची समस्या उद्भवते. गुरुवारी दिघा येथील सुभाषनगरमध्ये सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उच्च दाबाच्या भूमिगत विद्युत वाहिनीत तंत्रिक बिघाड झाल्याने स्फोट झाला. यात शेजारी खेळणारा वृषभ तिवारी जखमी झाला. तर शेजारी उभा असलेला कन्नम हरिदास हा युवक गंभीर जखमी झाला. जखमींना कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही दुर्घटना दिघा येथे घडली असली तरी त्याची जबाबदारी घेण्यावरून महावितरणच्या दोन विभागीय कार्यालयाकडून हद्दीचा वाद पुढे केला जात असल्याचे दिसून आले आहे. ऐरोली विभागीय कार्यालयाकडून दुर्घटनाग्रस्त विभाग विटावा उपकेंद्रांअतर्गत येत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर विटावा केंद्रातून सदर परिसर कळवा उपकेंद्राच्या अखात्यारीत येत असल्याचे सांगण्यात आले.
वीज वाहिनीचा स्फोट , चिमुरड्यासह एक जखमी
By admin | Published: May 12, 2017 2:01 AM