Join us  

‘त्या’ स्फोटक कारचे दहशतवादी कनेक्शन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:06 AM

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून एनआयएला अहवाल; टेलिग्रामवरील मेसेज म्हणजे निव्वळ खोडसाळपणालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्योजक मुकेश ...

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून एनआयएला अहवाल; टेलिग्रामवरील मेसेज म्हणजे निव्वळ खोडसाळपणा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी सहायक निरीक्षक सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाला असतानाच या प्रकरणामागे कोणतीही दहशतवादी संघटना नसल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) त्याबद्दल कळविले आहे. टेलिग्रामवरील त्याबाबतचा मेसेज आणि तिहार कनेक्शन हा सगळा निव्वळ खोडसाळपणा असल्याचे त्यांनी दिलेल्या अहवालात नमूद केले असल्याचे समजते.

२५ फेब्रुवारी रोजी पेडर रोड परिसरात सापडलेल्या या कार ठेवण्याच्या कृत्याची ‘जैश उल हिंद’ नावाच्या संघटनेने जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, चौकशीमध्ये ते खोटे असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत मुंबई पोलिसांनी एका खासगी सायबर कंपनीचे साहाय्य घेतले होते. त्याच्या तपासात इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरकडून दिल्लीच्या तिहार जेलमधून एक फोन जप्त केला. तहसीनजवळ जो मोबाइल सापडला त्यात एक टेलिग्राम चॅनल ॲक्टिव्हेट केले होते. टोर ब्राऊजरवरून व्हर्च्युअल नंबर क्रिएट केला गेला होता. त्यावरूनच अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके आणि त्यानंतर धमकीबाबतची पोस्ट तयार केल्याचे कनेक्शन जोडले गेले होते. मात्र, त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एनआयएच्या अधिकाऱ्यांना कळविले.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फाेटकांनी भरलेल्या त्या स्कॉर्पिओच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्कॉर्पिओसाेबत कसलीही छेडछाड किंवा खरचटले नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे ही कार चोरीला गेली असताना तिला कोठेही खरचटले नसल्याबद्दल संशय व्यक्त केला जात होता.

..................