लंडनला २१ डझन हापूस निर्यात, मुहूर्ताच्या पहिल्या पेटीला ५१ पौंडचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:07 AM2021-02-25T04:07:54+5:302021-02-25T04:07:54+5:30
मुंबई : यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याच्या एक डझनाच्या २१ पेट्या लंडनमध्ये फेब्रुवारीत दाखल झाल्या. पहिल्या एक डझनच्या पेटीला ...
मुंबई : यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याच्या एक डझनाच्या २१ पेट्या लंडनमध्ये फेब्रुवारीत दाखल झाल्या. पहिल्या एक डझनच्या पेटीला ५१ पौंड म्हणजेच सुमारे पाच हजार रुपये एवढा दर मिळाला. अन्य २० डझनला प्रत्येकी ३० पौंड दर मिळाला. यानिमित्ताने फेब्रुवारी महिन्यात प्रथमच हापूस आंबा निर्यात करण्यात आला. जर्मनी आणि युरोपमध्येही लवकरच आंब्याची निर्यात करण्यात येणार आहे.
वेस्टर्न इंटरनॅशनल मार्केटच्या केतुल पटेल यांना या वर्षीचा पहिला २१ डझन रत्नागिरी हापूस आंबा खरेदी करण्याचा मान मिळाला. लंडनमधील मराठी उद्योजक तेजस भोसले आणि कोकण ॲग्रो एक्सपोर्टचे उद्योजक दीपक परब यांच्या मदतीने कोकणातील हापूस फेब्रुवारी महिन्यात लंडनला दाखल झाला. राजापूर पडवे गावातील बाबू अवसरे, कुंभवडे गावातील पंढरीनाथ आंबेरकर आणि वाडा तिवरे गावातील जयवंत वेल्ये यांना राजापूरमधील हापूस आंबा थेट शेतातून लंडनमध्ये निर्यात करण्याची संधी उपलब्ध झाली. या वर्षी कोकणातून युरोपच्या बाजारपेठेत एक लाख डझन आंबे थेट विक्री करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाला ॲग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे साहाय्य मिळाले.
दरम्यान, कोकणातील स्वावलंबी शेतकऱ्यांना जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध व्हावी, देशविदेशातील नागरिकांना कोणतीही भेसळ नसलेल्या आणि संपूर्णतः नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या हापूस आंब्याची गोडी चाखता यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोकणातील १०० शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी पिकवलेल्या हापूसचा ग्लोबल ब्रँड बाजारात आणण्यासाठी देशातील पहिला व्यापारी प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे. याचा शुभारंभ, माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते १ मार्च रोजी दिल्ली येथे होणार आहे, अशी माहिती ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे संस्थापक संजय यादवराव यांनी दिली.