Join us

प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी स्थापन करण्यात आली असून जिल्हानिहाय निर्यात आराखडा तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी स्थापन करण्यात आली असून जिल्हानिहाय निर्यात आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उद्योग विभागाचे आयुक्त तथा राज्याचे निर्यात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

आजादी का अमृत महोत्सव -७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारकडून वाणिज्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत मुंबईतील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन दिवसीय परिषदेचे आयोजित करण्यात आले होते. या परिषदेची बुधवारी सांगता झाली. विविध क्षेत्रांतील सुमारे २०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. यात उद्योजक, निर्यात प्रचालन परिषदांचे पदाधिकारी, निर्यातदार, शासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांच्या या परिषदेत एकूण दहा पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या.

शासनाच्या पाठिंब्याच्या माध्यमातून द्विपक्षीय व्यापार संधी, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स, डेव्हलपमेंट क्रेडिट गॅरंटी इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील निर्यात संधी, पायाभूत सुविधा, बँकिंग आणि वित्तीय सहकार्य याशिवाय खाद्य, कापड, इंजिनिअरिंग, केमिकल आणि औषध निर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी या विषयातील संधी या विषयावर चर्चासत्रे झाली. निर्यात प्रोत्साहनासाठी राज्य आणि केंद्र शासनाचे सहकार्य, निर्यात वाढीसाठी द्विपक्षीय व्यापाराच्या संधी, महाराष्ट्र एक निर्यात हब. निर्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचे सहकार्य, निर्यातीसाठी बंदरे आणि लॉजिस्टिक्स यांचे महत्त्व, निर्यात प्रोत्साहनासाठी बँकिंग आणि फायनान्स, खाद्य क्षेत्रातील निर्यात संधी, अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यात संधी या विषयांवर मान्यवरांनी चर्चासत्रात भाग घेतला. यासोबतच या क्षेत्रातील उद्योजकांनी आपले अनुभव या ठिकाणी सांगितले. या परिषदेत रशिया, तुर्की, दक्षिण आफ्रिका, स्पेन आणि मॉरिशसचे राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित होते.