मुंबई : कोरोनाच्या प्रकोपामुळे लॉकडाऊन झालेले असतानाही जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ला गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात ८९ % निर्यात करण्यात यश आले आहे. जागतिक बाजारपेठेतील पुरवठा साखळी कायम ठेवण्यामध्ये याचा मोठा लाभ होत आहे. जेएनपीटी हे देशातील महत्त्वाचे कंटेनर हाताळणी केले जाणारे बंदर आहे. जेएनपीटी बंदराद्वारे 2 लाख 89 हजार 292 टीईयू ची हाताळणी करण्यात आली आहे. ही कामगिरी मे 2020 च्या तुलनेत 5.29% अधिक आहे.
जून महिन्यात 166 मालवाहू जहाजे जेएनपीटी मध्ये आली याद्वारे एकूण 4.07 दशलक्ष टन मालाची हाताळणी करण्यात आली. रेल्वे ऑपरेशनमध्ये एकूण 511 रेक्सची वाहतूक करण्यात आली मे महिन्यात हे प्रमाण 499 रेक्स होते. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी याबाबत म्हणाले, जेएनपीटी द्वारे देशाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न असून आम्ही त्यासाठी तत्पर आहोत. पुढील काळात जेएनपीटी द्वारे होणाऱ्या कामामध्ये अधिक वाढ करण्याचा आमचा मानस आहे. सर्व स्टेक होल्डरच्या सहकार्यातून या आर्थिक संकटातून बाहेर पडणे सर्वांना शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लॉकडाऊन काळात व्यापार सुरळीत चालण्यासाठी जेएनपीटीने विशिष्ट कार्य प्रणाली विकसित केली आहे. एसओपी च्या माध्यमातून जेएनपीटीने कंटिन्युटी ऑफ बिजनेस प्लँन तयार केला असून त्याद्वारे काम केले जात आहे. जेएनपीटी द्वारे देशातील विविध वस्तुंची निर्यात व परदेशातील विविध वस्तुंची आयात करणे व्यापारी वर्गाला, उद्योजकांना सुलभ ठरत आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत फारसा व्यत्यय न येता व्यापार, उद्योगाशी संबंधित कामे होऊ लागल्याने व्यापारी वर्गातुन समाधान व्यक्त केले जात आहे.