ठाणे : शाळकरी मुलींना खाऊचे आमिष दाखवून त्यांना वाममार्गाला लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या इडली-सांबर विक्रेत्याचा पर्दाफाश झाला आहे. कोपरीच्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेबाहेर पप्पू माकवाना हा खाद्यपदार्थांचा ठेला लावत असे. त्याने सुरुवातीला काही मुलींना मोफत खाऊ देण्याचे आमिष दाखविले. नंतर, मात्र त्यांना त्याने वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्यानंतर त्याला कोपरी पोलिसांनी अटक केली आहे.त्याने २४ फेबु्रवारीला एका अकरावर्षीय मुलीला चिठ्ठी पाठवून अनैतिक कामासाठी दोन तासांचे चार हजार रुपये देण्याचे आमिष दाखविल्याचे उघड झाले. कोपरीतील नातेवाइकांकडे राहणारा पप्पू पूर्वी एका खासगी कंपनीत नोकरीला होता. नोकरी गेल्यामुळे तो एका शाळेच्या बाहेर इडली विक्रीचा धंदा करीत होता. शाळेतील मुलींना मोफत खाऊ देऊन त्यांच्याशी त्याने ओळख वाढविली होती. त्यांच्याशी लगट करून त्यांना मोबाइलमधील गेम आणि अश्लील चित्रेही तो दाखवित असे. मंगळवारी त्याने एका मुलीला तिच्या मैत्रिणीमार्फत चिठ्ठी पाठवून अनैतिक कामातून पैसे कमविण्याचे आमिष दाखविले. इतर मुलींनाही या व्यवसायासाठी तयार करण्यास त्याने बजावले होते. सुदैवाने ही चिठ्ठी त्याच शाळेतील आठवीत शिकणाऱ्या पीडित मुलीच्या भावाच्या हातात पडल्यामुळे हा प्रकार उघड झाला. (प्रतिनिधी)
विद्यार्थिनींना वाममार्गाला लावू पाहणा-याचा पर्दाफाश
By admin | Published: February 26, 2015 10:53 PM