Join us

नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:06 AM

नोएडातील तरुणीसह तिघांना अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांना लुबाडणाऱ्या नोएडातील ...

नोएडातील तरुणीसह तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांना लुबाडणाऱ्या नोएडातील एका टोळीचा छडा लावण्यात पायधुनी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका तरुणीसह तिघाजणांना अटक करून त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाइल, लॅपटॉप, डेबिट व एटीएम कार्ड, आदी जप्त केले आहे.

गीता तेजवीर सिंग (वय २७), कैलास चंद रामचंद (२९) व सतीश कुमार कल्याण सिंग (२७, सर्व रा. एस. एस. कॉम्प्लेक्स, मेट्रो स्टेशनजवळ, ममुरा, नोएडा, गौतम बुद्धनगर, उत्तरप्रदेश) अशी नावे असून त्यांनी अनेकांना गंडा घातला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

पायधुनी परिसरात राहत असलेल्या एका तरुणाला गेल्या १२ एप्रिलला गीताने नौकरी डॉट कॉमवरून बोलत असल्याचे सांगून ॲक्सिस बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी बोगस डोमेन व ईमेल बनवून नोकरीसाठी विविध चार्जेस, फी भरण्यास सांगितले. त्याला कोटक बँक, मोबिकविक वॉलेटद्वारे येस बँकेतील खात्यावर २२ एप्रिलपर्यंत वेळाेवेळी रक्कम भरण्यास लावून एकूण एक लाख, ३८ हजार ८१७ रुपये वसूल केले. त्यानंतर नियुक्ती पत्र पाठविले असल्याचे सांगितले. मात्र ते बनावट असल्याचे समजल्यावर फसवणूक लक्षात आली. त्याने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर परिमंडळ-२ चे उपायुक्त राजीव जैन, साहाय्यक आयुक्त शरद नाईक यांच्या सूचनेनुसार माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे, वरिष्ठ निरीक्षक सुभाष दुधगावकर, निरीक्षक कलीम शेख यांनी माहिती घेतली असता ते नोएडामध्ये असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर निरीक्षक अनंत साळुंखे, सहायक निरीक्षक नीलेश बनकर हे पथकासमवेत तेथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने तिघांना पकडले. त्यांच्याकडून १४ मोबाईल फोन, ८ सिम कार्डे, ३ लॅपटॉप, २५ डेबिट, एटीएम कार्ड, ६ आधार कार्ड, १४ बँकेचे पत्रे तसेच रोख, ८ हजार ६०० रुपये जप्त केले. अशा प्रकारे फसवणूक झालेल्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त राजीव जैन यांनी केले आहे.