Join us

मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी लाखोंची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:07 AM

सायन मेडिकल कॉलेजचा उपअधिष्ठाताही जाळ्यातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील सायन रुग्णालय, केईएम रुग्णालयासह नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश ...

सायन मेडिकल कॉलेजचा उपअधिष्ठाताही जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालय, केईएम रुग्णालयासह नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा सायन पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत पर्दाफाश केला. यातील एका कारवाईत सायन मेडिकल कॉलेजचे उपअधिष्ठाता राकेश रामनारायण वर्मा (५४) याला अटक केली आहे.

मध्य प्रदेशच्या रहिवासी असलेल्या डॉक्टर अलिशा अब्दुल्ला शेख यांच्याकडे वर्माने सायन रुग्णालय मेडिकल कॉलेज येथे एमडीचे शिक्षण घेण्याकरिता ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यांनीही विश्वास ठेवून ५० लाख रुपये वर्माला दिले. मात्र पैसे देऊनही प्रवेश न मिळाल्याने शेख यांनी सायन पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासात वर्मा यांच्या कॉर्पोरेशन बँक खात्यावर शेख यांच्या वडिलांनी २१ लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार बुधवारी नायर रुग्णालयाच्या डॉक्टर वसाहतीतून वर्माला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने शेख यांच्याकडून ५० लाख रुपये घेतल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. त्याने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.

अप्पर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त विजय पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त बी. एस. इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी घुगे, निकिता नारणे, जाधव, गायकर यांनी ही कारवाई केली.

* टाेळीचे देशभरात जाळे

मुंबईतल्या नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये सरकारी कोट्यातून प्रवेश मिळवून देणाऱ्या टोळीचे जाळे देशभरात पसरल्याचा संशय पोलिसांना आहे. झारखंडचे रहिवासी असलेले व्यापारी राजू रामनाथ पांडे यांच्या मुलाला सायन रुग्णालय मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएससाठी सरकारी कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली हिमांशू कला, निखिल श्रीवास्तव, सतीश सेन, डॉक्टर कौशिक मेहता यांनी ३१ लाख ३ हजार ३०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणीही सायन पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल होताच, पथकाने तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास सुरू केला. यात, नवी मुंबईतून माधव यादव (२६) उर्फ निखिल श्रीवास्तव, अरुण मिश्रा (२८), सिद्दिकी आझम अकबर (४०), राहुल कुमार सुधीर कुमार सिंह (२५) यांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण १४ मोबाइल, विविध कंपन्यांची ३६ सिम कार्ड, सायन, केईएम आणि एम.बी.टी. मेडिकल कॉलेजचे बनावट शिक्के व प्रवेश अर्ज, बनावट ओळखपत्र, आधार कार्ड तसेच विविध बँकांची ३० डेबिट कार्ड, गुन्ह्यात वापरलेली मोटार कार, विद्यार्थ्यांच्या याद्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांची टोळी ही संपूर्ण भारतात कार्यरत असल्याची माहिती समोर आली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोपळघट, नाईकवाडी, कांबळे, पाटील यांनी ही कारवाई केली असून, अधिक तपास सुरू आहे. ही टोळी फोनवरून संपर्क साधत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत होती. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. दोन्ही कारवाईतील आरोपींचा एकमेकांशी सबंध आहे का? याबाबतही तपास सुरू असल्याचे परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले.

...................