ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - लोअर परळ येथील यार्डात जाणारा एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्रीच्या दोनच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला असून चर्चगेटहून विरारकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. सकाळी ऐन कामावर जायच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यात प्रवाशांना थोडा दिलासा म्हणजे विरारहून-दादरपर्यंत जलद लोकल व्यवस्थित सुरु आहेत. दादारवरुन वाहतूक रखडत सुरु आहे.
लोअर परळ स्थानाकावरील प्लॅटफॉर्मक्रमांक १ जवळ एक्स्प्रेसचा पहिलाच डबा रुळावरुन घसरला. त्यामुळे लोअर परेलच्या फलाट क्रमांक १ आणि २ फलाटावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी क्रेनच्या सहाय्याने डब्बा हटवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.
डबा हटवून वाहतूक पूर्ववत व्हायला दुपारचे बारा वाजतील असे अधिका-यांकडून सांगितले जात आहे. मात्र वेळापत्रक पूर्णपणे पूर्वपदावर यायला दुपारचे दोन वाजतील असा अंदाज आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. ही एक्सप्रेस ट्रेन लोअर परेल यार्डातून मुंबई सेंट्रलला जाणार होती.
Mumbai: One empty coach of a train derailed in early morning hours between Elphinstone & Lower Parel Railway station pic.twitter.com/OrEy6cujGc— ANI (@ANI_news) May 31, 2016