एक्स्प्रेस वेवरकोंडी
By admin | Published: February 28, 2016 03:36 AM2016-02-28T03:36:10+5:302016-02-28T03:36:10+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर धोकादायक दरडी हटवून जाळी बसविण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबीने हाती घेतले आहे. २२ फेब्रुवारीपासून हे काम सुरू असून
खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर धोकादायक दरडी हटवून जाळी बसविण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबीने हाती घेतले आहे. २२ फेब्रुवारीपासून हे काम सुरू असून, पुण्याकडे जाणारी एक मार्गिका बंद ठेवण्यात आली आहे. वीकेंडला मार्गावर वाहनांची गर्दी होत असल्याने काम बंद ठेवण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला होता. मात्र शनिवारी काम सुरूच ठेवण्यात आल्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला.
शनिवारी पुण्याकडे जाणारी वाहने वाढल्याने द्रुतगती मार्गावर सकाळपासूनच प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.
पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने राज्य रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबीने धोकादायक दरडी काढून दरडी पडण्याची भीती असलेल्या ठिकाणी जाळी बसविण्याचे काम सुरू केले आहे. हे काम १९ दिवस चालणार आहे. शनिवारी काम सुरू असल्याने बंद ठेवण्यात आलेली एक मार्गिका आणि वाहनांची संख्या वाढल्याने पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.
अमृतांजन पुलाजवळ सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी एक मार्गिका बंद ठेवण्यात आली. इतर वेळीही या ठिकाणी संथगतीने वाहतूक सुरू असते. शनिवारी मुंबईतून पुणे आणि महाबळेश्वरला जाण्यासाठी अनेक वाहने रस्त्यावर आली होती. खालापूर टोलनाक्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बोरघाटात वाहतूककोंडी झाली होती. महामार्ग पोलीस वाहतूककोंडी दूर करण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते. या वाहतूककोंडीचा सर्वाधिक त्रास लहान मुले, वृद्धांना झाला असून वाहतूककोंडीत अनेक रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या. (प्रतिनिधी)
काम सुरू असल्याने पुण्याकडे जाणारी एक मार्गिका बंद ठेवण्यात आली होती. आता दोन मार्गिका सुरू आहेत, मात्र वाहनांची संख्या वाढल्यामुळे या रस्त्यावर सकाळपासूनच वाहतूककोंडी होत होती. दुपारनंतर वाहतूक पूर्वपदावर आली
- टी.एन. जोशी, साहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग