मुंबई : मुसळधार पाऊस आणि दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेचा गोंधळ उडाला. टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) अप-डाऊन मार्गावर वाहतूक सुरूआहे; मात्र टिटवाळा ते कसारा मार्ग अद्यापही लोकलसाठी खुला करण्यात आला नाही. प्रवाशांच्या सोईसाठी या मार्गावर सर्व एक्स्प्रेसला विशेष थांबा देण्यात आला आहे. अप-डाऊन मार्गावरील सर्व एक्स्प्रेसमधून टिटवाळा ते कसारा येथे राहणाºया प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.मंगळवारी आसनगावहून सीएसएमटीच्या दिशेने पहाटे ६ वाजून २५ मिनिटांनी लोकल रवाना झाली. हीच आसनगाव येथून सीएसएमटीच्या दिशेने येणारी शेवटची लोकल ठरली. दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्यानंतर आसनगाव आणि वाशिंददरम्यान रेल्वे रूळ नव्याने बसविण्यात आले. बुधवारी रात्री १२च्या सुमारास या मार्गावरून एक्स्प्रेस चालवण्यात आली. मात्र लोकल सेवा सुरू करण्यासाठी वेळ हवा, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अप आणि डाऊन मार्गावरील सर्व एक्स्प्रेसला टिटवाळा ते कसारादरम्यान विशेष थांबा देण्यात आला आहे. तशा सूचना एक्स्प्रेस मोटरमॅनला देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी दिली. टिटवाळा ते सीएसएमटी अप-डाऊन लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. टिटवाळा ते कसारा मार्गावर लवकरच लोकल धावणार आहे, पण तोपर्यंत प्रवाशांना एक्स्प्रेसने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.मंगळवारी पहाटे आसनगाव ते वाशिंद स्थानकादरम्यान वेहरोळी दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरले. यामुळे या मार्गावरील रेल्वे रूळ उखडला गेला. तर मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांशी रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले. पाण्यात रेल्वे आहे त्या ठिकाणी अडकल्यामुळे ३५ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, पाणी ओसरल्यानंतरही मध्य रेल्वेची लोकल वाहतूक सुरळित होऊ शकली नाही. २४ तास उलटल्यानंतरही लोकल सेवा सुरळित न झाल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होती.पहाटे ६ वाजून २५ मिनिटांची शेवटची लोकलमंगळवारी आसनगावहून सीएसएमटीच्या दिशेने पहाटे ६ वाजून २५ मिनिटांनी लोकल रवाना झाली. हीच आसनगाव येथून सीएसएमटीच्या दिशेने येणारी शेवटची लोकल ठरली.दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्यानंतर आसनगाव आणि वाशिंददरम्यान रेल्वे रूळ नव्याने बसविण्यात आले. या मार्गावरून एक्सप्रेस सुरू आहेत.प्रवाशांचा वासिंद स्थानकावर रेल रोकोशहापूर : मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि वासिंददरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे डबे मंगळवारी घसरले. त्यानंतर कल्याण-कसारा या मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक तब्बल ७२ तासांनंतरही पूर्वपदावर आलेली नाही. यामुळे संतापलेल्या रेल्वे प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी साडे सातच्या सुमारास वासिंद स्थानकावर रेल रोको केला. रुळावर उतरून दादर-अमृतसर ही गाडी वासिंदजवळ रोखून धरली.सलग चौथ्या दिवशी वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचा उद्रेक झाला. रेल्वेच्या गोंधळामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, वासिंद-कसारादरम्यान राहणाºया नोकरदारांना मुंबईत कामावर हजर होणे शक्य होत नाही.एक्स्प्रेसऐवजी वासिंद ते सीएसएमटी लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. वासिंद ते कल्याणदरम्यान रेल्वेमार्ग सुस्थितीत असूनही रेल्वे प्रशासन लोकल का सुरू करीत नाही, असा संतप्त सवाल प्रवासी रेल्वे अधिकाºयांना करीत होते. या संतप्त नोकरदारांनी रेल्वे सेवा पूर्ववत होण्याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
गोंधळ निस्तरेपर्यंत ‘एक्स्प्रेस’ला विशेष थांबा, एक्स्प्रेस टिटवाळा ते कसारादरम्यान थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 5:31 AM