नागरिकांनो व्यक्त व्हा, आत्महत्या शेवटचा पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:07 AM2021-04-30T04:07:41+5:302021-04-30T04:07:41+5:30
मानसोपचार तज्ज्ञांचे मत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संकटामुळे रोजगार बुडाला, तर कुठे हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. ...
मानसोपचार तज्ज्ञांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संकटामुळे रोजगार बुडाला, तर कुठे हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. डोळ्यादेखत जवळची व्यक्ती प्राण सोडत आहे. याचा फटका नागरिकांच्या मनःस्वास्थ्यावर होत आहे. सगळीकडे नकारात्मकतेची चादर पसरली असली तरी हे संकट लवकरच संपणार असल्याचा सकारात्मक विचार करायला हवा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला. जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त व्हा. आत्महत्येचे विचार येत असतील तर थेट मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
एनसीआरबीने जारी केलेल्या अहवालानुसार, २०१९ मध्ये देशात १ लाख ३९ हजार १२३ लोकांनी आत्महत्या केली. यात बेरोजगारीमुळे २ हजार ८५१ लोकांनी स्वतःचे आयुष्य संपविले. २०१८ च्या तुलनेत हा आकडा ३.४ टक्क्यांंनी वाढला आहे. यात महाराष्ट्र (१८,९१६) आघाडीवर असून त्यापाठोपाठ तामिलनाडू, पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. यात मुंबईत १२२९ लोकांचा समावेश होता. त्यातच आता कोरोनामुळे नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. काही ठिकाणी आत्महत्येच्या घटनाही घडत आहे.
मानसोपचार तज्ज्ञ सागर मुंदडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनात नकारात्मक विचार येत असतील तर जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त व्हा, यामुळे तुम्हाला हलके वाटेल. व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्यावर भर द्या. त्याचा खूप फायदा होतो. नकारात्मकता साेडून द्या. हे संकट कधी तरी संपणार आहे, असा सकारात्मक विचार करा, तसेच असा सकारात्मक विचार असणाऱ्यांंशी बोला.
दिवसभर नकारात्मक बातम्या पाहू नका. त्याकडे केवळ प्रेक्षक म्हणून बघा, त्यात गुंतू नका. हीच वेळ आहे ज्यात आपण स्वतःला अधिक प्रशिक्षित करू शकतो. माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मी कंट्रोल करणे गरजेचे आहे. असे प्रत्येकाला वाटते त्यासाठी नियमित योगा, पुरेशी झोप, योग्य आहार घेणे गरजेचे आहे.
लस मिळणार की नाही, कोरोना कधी संपणार, अशा अनेक विचारांंनी सध्या नागरिक ग्रासले आहे. अशावेळी, जे विचार येतात ते लिहून काढा. त्याचे विभाजन करा. ज्यावर कृती करू शकत नाही, त्याकडे दुर्लक्ष करा. सोशल मीडियावर माइंड फूलनेसचे योगा आहेत. आपल्या मनाला आपण शांत कसे ठेवू शकतो यासाठी ते उपयुक्त आहेत. रोज सकाळी १० मिनिटे हा योगा करून पहा, असेही मुंदडा यांनी सांगितले.
आता सगळे संपले आणि आयुष्य संपविणे हा एकमेव पर्याय असल्याचे जर तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्ही थेट मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या, वेळीच उपचार सुरू करा. कारण या क्षणाला तुमच्या मनावर तुमचे नियंत्रण राहिलेले नाही, असा सल्लाही मुंदडा यांनी दिला.
* काय करावे, काय करू नये?
* योग्य पोषक आहार, पुरेशी झोप घ्या.
* सकारात्मक विचार करा.
* मनातील विचार लिहून काढ़ा, त्याचे विभाजन करा. ज्यावर काहीच करू शकत नाही ते विचार मनातून काढून टाका
* व्यक्त व्हा, व्हिडीओ कॉलचा आधार घ्या. जे तुमच्या नियंत्रणात आहे ते करा.
.......................................