अमोल पाटील, खालापूरमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून होर्डिंग बसविणाऱ्या कंपनीविरोधात आयआरबीने शुक्रवारी कारवाई करीत काम बंद केले आणि संबंधित कंपनीचे सामानही जप्त केले. या घटनेने पुन्हा एकदा एक्स्प्रेस वेवरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. होर्डिंग्ज लावताना लोखंडी वस्तू महामार्गावरून जाणाऱ्या वाहनावर आदळल्याने वाहनाचे नुकसान झाले आहे.खोपोली - पेण रस्त्यावरील दहिवली पालीफाटा येथील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील पुलावर एका जाहिरात एजन्सीचे शेकडो किलो वजनाचे लोखंडी होर्डिंग सुरक्षेचे नियम न पाळता उभारण्याचे येत होते. त्यावेळी एका वाहनावर लोखंडी वस्तू आदळली. याप्रकरणी वाहनचालकाने आयआरबीकडे तक्रार केल्यानंतर होर्डिंग बसवण्याचे काम बंद पाडण्यात आले आणि त्यांचे सामानही जप्त केले. या जाहिरात कंपनीला यापूर्वीही समज देण्यात आली होती. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर लाखो वाहनांची ये-जा सुरु असल्याने जाहिरातदारांनी याचा लाभ उठविण्यासाठी निरनिराळे फंडे अवलंबले आहेत. जाहिरात फलक उभारणीचे काम मनमानी पद्धतीने सुरू आहे. शुक्रवारच्या घटनेत काम करणाऱ्या कामगारांकडे सुरक्षेची कोणतीही साधने दिसून आली नाहीत. किंबहुना उभारण्यात येणारा वजनी फलक किरकोळ तारेच्या बांधणीने अडकवत येत होता. महामार्गावरील अपघात फक्त वेगाने वा वाहनचालकाच्या चुकीने होतात असे नाही, तर अनेकदा मोठे जाहिरात फलकही त्यास कारणीभूत असल्याचे अपघातग्रस्तांना मदत करणारे गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले.
एक्स्प्रेस वेची सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Published: April 24, 2015 10:48 PM