मराठी शाळांच्या स्पर्धेतून मराठी भाषाच हद्दपार? अभिनय स्पर्धा हिंदी, इंग्रजीतून घेण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 09:08 AM2022-10-02T09:08:28+5:302022-10-02T09:08:56+5:30
या स्पर्धा हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून घेण्याचा आग्रह धरण्यात आल्याने शिक्षण विभागानेच मराठीला हद्दपार केले की, काय अशी चर्चा आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्पांतर्गत लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धा घेण्याच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) करण्यात आल्या आहेत. मात्र, केवळ शासकीय शाळांसाठी असणाऱ्या या स्पर्धा हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून घेण्याचा आग्रह धरण्यात आल्याने शिक्षण विभागानेच मराठीला हद्दपार केले की, काय अशी चर्चा आहे.
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प कृती आराखडा २०२२-२३ नुसार लोकसंख्या शिक्षण विभागाने शिक्षण विभागाला विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात कळविले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य व जिल्हा स्तरावर लोकनृत्य व अभिनय स्पर्धा घेण्याचे नियोजन एससीईआरटीकडून करण्यात आले आहे. या स्पर्धा सर्व शासकीय (शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, समाजकल्याण, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय) या व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यासाठी असल्याचे एससीईआरटीकडून कळविण्यात आले आहे.
दरम्यान, शाळांना देण्यात आलेल्या सूचनांमध्ये या स्पर्धा हिंदी व इंग्रजी मधून घेण्यात याव्यात असे म्हटल्याने शिक्षण विभागवार शिक्षक व मुख्याध्यापकांकडून विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एससीईआरटी हे मराठीला डावलून राज भाषेचा अपमान करीत आहेत तसेच या स्पर्धा हिंदी व इंग्रजी भाषेत देण्याची सक्ती करीत आहे. या स्पर्धेसाठी मराठीचा पर्याय दिला तर, मुलांना न्याय मिळेल. यातील ‘लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धा’ मराठीत घ्यायच्या नाहीत म्हणजे एकप्रकारे महाराष्ट्राची संस्कृती या स्पर्धेत दिसू नये का? असाही प्रश्न पडतो. - सुशील शेजुळे, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघटना.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"