Join us

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंची हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 8:06 AM

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाचा मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेनेला छेद पडण्यास सुरुवात झाली आहे

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षात फूट पडल्याचं चित्र दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात मुंबईतीलही काही आमदार सहभागी झाले. त्यात मागठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीही शिंदे गटाशी जुळवून घेतले. आता शिवसेनेचे नगरसेवक, माजी नगरसेवकही शिंदे गटात सामील होत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ पाठोपाठ मुंबईतही शिवसेनेला फटका बसताना दिसत आहे. 

शिवसेनेच्या विभाग क्रमांक १ च्या माजी नगरसेविका आणि पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि महिला उपविभाग संघटक गौरी खानविलकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी रात्री शीतल म्हात्रे यांनी काही कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना साथ देत एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

शिंदेंच्या बंडानंतर काय म्हणाल्या होत्या शीतल म्हात्रे?शिवसेना नेहमी संघर्ष करत असते. बंडखोरांना शिवसैनिकांनी आमदार बनवलं आहे. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसोबत आम्ही उभे आहोत. आम्ही रस्त्यावर शिवसैनिक उभं राहणार आहोत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे सगळं होत आहे. शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर कायम राहणार आहे. आज गुवाहाटीत बसले आहेत, काय तो दांडा, काय तो डुक्कर, सगळं कसं ओके करणार आहोत आपण, शिवसेनेला शून्यातून उभं करण्याची सवय आहे असं शीतल म्हात्रेंनी म्हटलं होतं. तर शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या अग्निकन्या आहेत अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी कौतुक केले होते. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाचा मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेनेला छेद पडण्यास सुरुवात झाली आहे. शीतल म्हात्रे या दहिसर पश्चिम येथील वॅार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका होत्या. शीतल म्हात्रे दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आल्या. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दहिसर, बोरिवली आणि मागाठाणे मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली होती. मात्र, त्यानंतरही शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे