बंडखोर शिवसैनिकांची हकालपट्टी
By Admin | Published: February 10, 2017 04:55 AM2017-02-10T04:55:55+5:302017-02-10T04:56:36+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाचे झेंडे फडकाविणाऱ्या शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची भूमिका शिवसेना नेतृत्वाने स्वीकारली आहे
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाचे झेंडे फडकाविणाऱ्या शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची भूमिका शिवसेना नेतृत्वाने स्वीकारली आहे. चर्चा, विनंती आणि आवाहनानंतरही बंडाचे झेंडे खाली न घेणाऱ्या २६ शिवसैनिकांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशा कारवाईचे आदेश दिले आहेत. या २६ जणांमध्ये अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही कारवाई म्हणजे पक्ष नेतृत्व आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना कठोर इशारा असल्याचे मानले जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी गोरेगाव येथील पदाधिकारी मेळाव्यात भाजपासोबत २५ वर्षांची युती तोडण्याची घोषणा केली. तत्पूर्वी कठोर निर्णय घेतल्यास पाठिंबा देणार का, अशी विचारणा करतानाच ज्यांना माझे नेतृत्व मान्य नाही त्यांनी आताच शिवसेनेतून बाहेर पडावे. नंतर मात्र बंडखोरी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. पालिका निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काही ठिकाणी नाराजी उमटली. कुणी स्वत:ला उमेदवारी न मिळाल्यामुळे तर कुणी स्थानिक उमेदवाराला डावलून बाहेरचा उपरा उमेदवार लादल्याने बंडाचे निशाण फडकाविले होते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकण्याचा चंग बांधलेल्या शिवसेना नेतृत्वाने बंडखोरांची समजूत काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. त्यामुळे या
वेळेत बंडखोरांची समजूत काढून त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न केले गेले.
वरळी, प्रभादेवी भागातील नाराजांना तर चर्चेसाठी मातोश्रीवर बोलाविण्यात आले. खासदार राहुल शेवाळे याबाबत सर्व सूत्रे हलवत होते. भाजपाने शिवसेनेला दिलेले आव्हान, शिवसेनेसोबतच्या बांधिलकीची आठवण आदी आवाहन, मिनतवाऱ्या तर काही जणांना संघटनेतील पदांचे आमिषही दाखविण्यात आले. या सर्वातूनही बंडाचे निशाण मागे घेण्यास नकार देणाऱ्या शिवसैनिकांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. निवडणुकीच्या काळात शिवसेनेशी संबंध असल्याच्या कारणावरून या उमेदवारांना कोणतीही सहानुभूती मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्वत: उद्धव ठाकरे यांनी बंडोबांना माघार घेण्याचे जाहीर आवाहन केले होते. इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न आहे. काही जणांना मी हात जोडून विनंती केली आणि त्यांनी अर्ज मागे घेतले. काहींना भेटणे शक्य झाले नसेल तर त्यांनी ही व्यक्तिगत विनंती समजावी. माणूस नाही, शिवसेनेकडे पाहून विचार करा, असे आवाहन त्यांनी सभेत केले होते.
मात्र, जर विचार करणारच नसाल तर शिवसेनेतून बाहेर काढावे लागेल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर गुरुवारी बंडखोरांवरील कारवाईद्वारे यापुढे पक्ष आणि नेतृत्वाच्या विरोधातील कारवाया खपवून घेणार नसल्याचा स्पष्ट इशारा उद्धव यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)