मुंबई विमानतळावर कोरोना अहवाल तपासणी काऊंटर वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:32+5:302021-06-16T04:08:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र वगळता अन्य राज्ये आणि परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल सादर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र वगळता अन्य राज्ये आणि परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, कोरोना अहवालाची तपासणी करण्यासाठी मर्यादित काऊंटर असल्याने प्रवाशांना एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे काऊंटर्सची संख्या वाढविण्याची त्यांची मागणी आहे.
मुंबई विमानतळावरील दैनंदिन प्रवासीसंख्या कमी झाल्याने टर्मिनल १ बंद करण्यात आले. सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक टर्मिनल २ वरून सुरू आहे. मे महिन्याच्या आकडेवारीनुसार येथील सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या १७ हजार ६०० इतकी नोंदविण्यात आली आहे. मात्र, इतक्या प्रवाशांचे आरटी-पीसीआर अहवाल तपासण्यासाठी केवळ दोन काऊंटर उपलब्ध असल्याने लांबलचक रांगा लागत आहेत. एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने वेळ वाया जातोच, शिवाय सुरक्षित अंतर या नियमांचे अजिबात पालन केले जात नसल्याने कोरोना संसर्गाची भीतीही बळावल्याची माहिती शुभम शहा या प्रवाशाने ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई विमानतळ प्रशासनाने अहवाल तपासणी काऊंटर्सची संख्या वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई विमानतळावर सकाळी ६ ते ८ आणि संध्याकाळी ७ ते ९ पर्यंत प्रवाशांची संख्या जास्त असते. अन्य वेळेत मात्र फारसे प्रवासी ये-जा करीत नाहीत. त्यामुळे काऊंटर्सची संख्या मर्यादित ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
........................................................................