Join us

लोककला आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवा

By admin | Published: May 28, 2016 1:49 AM

लोककलेचा मूळ गाभा कायम ठेवत लोककलांचा ठेवा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविला पाहिजे. त्यासाठी लोककलावंतांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे, असे आवाहन

मुंबई : लोककलेचा मूळ गाभा कायम ठेवत लोककलांचा ठेवा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविला पाहिजे. त्यासाठी लोककलावंतांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले. तसेच तमाशा कलावंतांकडून होणाऱ्या तमाशा महोत्सवाच्या मागणीवर विचार करून राज्य सांस्कृतिक विभागामार्फत तमाशा फडांची स्पर्धा राज्यात आयोजित केली जाईल, असे आश्वासनही तावडे यांनी दिले.गुरुवारी रवींद्र नाट्यमंदिर येथील मिनी थिएटरमध्ये आयोजित प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना साहाय्यक अनुदान वितरण कार्यक्रमात बोलत होते. या वेळी प्रभारी संचालक संजय पाटील, उपसचिव संजय भोकरे आदी उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमात तावडे यांनी राज्यातील कानाकोपऱ्यांतून आलेल्या लोककलावंतांचे शासनाकडून असलेल्या अपेक्षा आणि कलावंताची कला टिकविण्यासाठी शासनाकडून कलाकारांप्रति असलेली प्रतिबद्धता जाणून घेतली. या वेळी अनुदानप्राप्त तब्बल ३६ संस्थांच्या प्रतिनिधींनी तावडे यांच्यासमोर समस्या मांडल्या. यात मंगला बनसोडे यांच्याकडून खऱ्या तमाशा कलाकारांना टीव्हीसारख्या माध्यमांपासून वंचित ठेवले जात असून उपहासात्मक वागणूक दिली जात आहे. याशिवाय पूर्वी शासनाकडून राज्यभरात होणारे तमाशा महोत्सव मुंबई वगळता अन्य ठिकाणी बंद करण्यात आल्यामुळे तमाशा कलाकाराला स्पर्धेत उतरता येत नसल्याची खंत बोलून दाखविली. याशिवाय स्व. वसंतराव चांदोरकर मेमोरिअल ट्रस्टचे दीपक चांदोरकर यांनी केंद्र सरकारकडून संस्कृतीचे जतन करणाऱ्या संस्थांना दिले जाणारे अनुदान हे राज्यातील संस्थांपर्यंत पोहोचले जात नसल्याची खंत व्यक्त केल्यानंतर याबाबतही राज्य सरकारकडून विचार करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले.या वेळी ग्रामीण भागातील तमाशा, लावणी, दशावतार, खडीगंमत, शाहिरी इत्यादीसारख्या कला सादर करणाऱ्या लोककलांच्या ३६ कलापथकांना अनुदान वितरित करण्यात आले. २०१५-१६ या वर्षी राज्यातून तब्बल ४४७ संस्थांनी अर्ज केले होते. यातून त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना अ, ब, क वर्गवारीप्रमाणे अर्थसाहाय्य दरवर्षी मंजूर करून ३६ संस्थांना ४१ लाख ५० हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले. याबरोबरच शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना पं. भीमसेन जोशी यांच्या नावे आर्थिक साहाय्य योजना दिली गेली. (प्रतिनिधी)