Join us

स्टँप ड्युटी सवलत कालावधी १२ महिन्यांनी वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:06 AM

मुंबई : स्टँप ड्युटी कमी केल्यामुळे गृहखरेदीचा वाढलेला कल, मालमत्ता नोंदणीचे वाढलेले प्रमाण, वाढलेली रोजगार निर्मिती, कर संकलन यामुळे ...

मुंबई : स्टँप ड्युटी कमी केल्यामुळे गृहखरेदीचा वाढलेला कल, मालमत्ता नोंदणीचे वाढलेले प्रमाण, वाढलेली रोजगार निर्मिती, कर संकलन यामुळे उद्योगावर सकारात्मक परिणाम झाला आहे. या कारणाने अर्थव्यवस्थेतील पुनरुज्जीवित करण्यासाठी स्टँप ड्युटी सवलतीचा कालावधी १२ महिन्यांनी वाढवून ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

क्रेडाई एमसीएचआयने सरकारला याबाबतचे निवेदन सादर केले असून, मुंबई महानगर प्रदेशातील रिअल इस्टेट क्षेत्र वधारत आहे. साथीच्या आजारामुळे नागरिक आणि संभाव्य गृहखरेदीदार यांच्यावर सध्याच्या आर्थिक अस्थिरतेमुळे आलेल्या परिस्थितीमुळे याबाबतच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत. कमी करण्यात आलेल्या स्टँप ड्युटीचा कालावधी वाढविला तर गेल्या सहा महिन्यांमध्ये जी विक्रमी प्रॉपर्टी नोंदणी झाली तो वेग पुढे कायम राहील, असा दावा करण्यात आला आहे. क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या ६ महिन्यांमध्ये विक्रमी प्रॉपर्टी नोंदणी झाली आहे. गृहखरेदीदारांचा घरखरेदीकडे कल वाढू लागला आहे. हे पाहता सरकारने स्टँड ड्युटीवरील सवलतीचा कालावधी पुढील १२ महिन्यांसाठी वाढवावा.