"व्यापाऱ्यांची कांदा साठवणूक क्षमता अन् ग्रेडिंग पॅकेजिंगचा अवधी वाढवा"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 12:36 AM2020-11-01T00:36:46+5:302020-11-01T00:37:15+5:30
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता २५ मे. टन तर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ती केवळ २ मे. टन इतकीच केली आहे.
मुंबई : व्यापाऱ्यांची कांदा साठवणूक क्षमता २५ मेट्रिक टनावरून १,५०० मेट्रिक टन करा तसेच, कांदा खरेदीच्या दिनांकापासून ग्रेडिंग, पॅकेजिंगसाठीचा कालावधी तीन दिवसांवरून किमान सात दिवस करा, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांना पाठविले आहे.
ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता २५ मे. टन तर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ती केवळ २ मे. टन इतकीच केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांकडून बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीवर विपरित परिणाम झाला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी बंद केल्याने किरकोळ बाजारात कांदा महागला आहे.
खरिपाचा कांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येणे अपेक्षित आहे. खरिपाचा कांदा नाशवंत स्वरूपाचा असतो त्यामुळे जर सध्याच्या साठवणूक क्षमतेच्या निकषामुळे व्यापाऱ्यांकडून हा कांदा खरेदी झाला नाही तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. कांद्याच्या आयातीला स्टॉक मर्यादेतून सूट देण्यात आली आहे. त्या धर्तीवर साठवणुकीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.