मुंबई: महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात भारताच्या निवडणूक आयोगाचे चिफ इलेक्शन कमिश्नर आणि महाराष्ट्राचे चिफ इलेक्ट्रोरल ऑफिसर यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे लोढा यांनी सदर निवडणुकीसाठी मतदारांना आपले नाव यादीत समाविष्ट करण्यासह संपूर्ण प्रक्रियेसाठी वेळ वाढवून देण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि सुरु असलेली उपोषणे या सर्व कारणांमुळे इच्छुक मतदारांना, त्यांच्या नाव नोंदणीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त मतदारांची नाव नोंदणी व्हावी त्याकरिता मतदार नाव नोंदणीसाठी देण्यात आलेल्या कालावधीमध्ये वाढ करावी असे लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याप्रमाणे ३० सप्टेंबर रोजी मतदार नोंदणीला सुरुवात झाली असून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ६ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहेत. परंतु यामध्ये मुदत वाढवून देण्याची मागणी मंत्री लोढा यांनी केली आहे.