टास्क फोर्समधील तज्ज्ञांची मागणी; केंद्राने लक्ष घालण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यातील लसीकरण प्रक्रियेची मोहीम व्यापक करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी राज्यातील टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी केली.
आरोग्य विभागाला केंद्र व राज्य सरकारकडून पुरेसे सहकार्य मिळत नाही, मात्र प्रत्येक गोष्टीसाठी आरोग्य विभागालाच जबाबदार धरले जाते. लोकांचा निष्काळजीपणा व मनमानी हेसुद्धा कोरोनावाढीचे प्रमुख कारण असून, आता सरकारने केवळ इशारेबाजी न करता कठोर पावले उचलली नाहीत तर काेरोनाची लाट वाढतच जाईल, असे निरीक्षण राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी मांडले. लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम आदींवर कठोर निर्बंध, व्यापक लसीकरण तसेच चाचण्यांची संख्या वाढवणे, रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध आदी उपाययोजना न केल्यास लाट वाढल्याशिवाय राहाणार नाही आणि त्याचा मोठा फटका बसेल, असा इशाराही त्यांनी दिला तर डॉ. राहुल पंडित यांनी लसीकरण प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत, याला सामान्यांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
...............................