कसाऱ्यापर्यंत वाढीव मार्गिका, कल्याण-मुरबाड रेल्वेला मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:48 PM2023-02-04T12:48:29+5:302023-02-04T12:48:48+5:30
Central Government : यंदाच्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्या पाच विभागांना १० हजार ६०० कोटींची तरतूद केली असून, ती गेल्यावर्षीच्या तुलनेत ४६ टक्के जास्त आहे.
मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्या पाच विभागांना १० हजार ६०० कोटींची तरतूद केली असून, ती गेल्यावर्षीच्या तुलनेत ४६ टक्के जास्त आहे. येत्या वर्षात कल्याण-कसारा तिसरी मार्गिका, कल्याण-मुरबाड रेल्वेच्या कामांना गती दिली जाईल. तसेच काही स्थानकांचा विकास केला जाणार आहे.
सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १०, ११, १२ आणि १३ वर २४ डब्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी २० कोटी, पनवेल-कळबोली कोचिंग टर्मिनस पहिल्या टप्प्यासाठी १० कोटी, बडनेरा-वंगण दुरुस्तीसाठी ४० कोटी, रत्नागिरी रोलिंग स्टॉक कारखान्यासाठी ८२ कोटी, रेल्वे मार्गिकेच्या नूतनीकरणासाठी १४०० कोटी, पुलाच्या-बोगद्यांच्या कामासाठी ११३ कोटी आणि सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशसाठी २३७ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
नवे रेल्वे मार्ग : कल्याण-मुरबाड (व्हाया उल्हासनगर) २८ किमी-१०० कोटी, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ २५० किमी- २०१ काेटी, वर्धा-नांदेड (व्हाया यवतमाळ-पुसद) २७० किमी- ६०० कोटी, धुळे-नंदुरबार ५० किमी- ११० कोटी, साेलापूर-उस्मानाबाद (व्हाया तुळजापूर) ८४ किमी - ११० काेटी, फलटण-पंढरपूर १५० किमी- २० कोटी.
दुपदरीकरण, चौपदरीकरण : कल्याण-कसारा तिसरी मार्गिका - ६८ किमी- ९० कोटी, जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका- २४ किमी- २० कोटी, वर्धा-नागपूर तिसरा मार्ग - ७६ किमी- १५० कोटी, वर्धा-बल्लारशहा तिसरी मार्गिका- १३२ किमी-३०० कोटी, इटासरी-नागपूर २८० किमी- ३१० काेटी, पुणे- मिरज- लोंढा दुहेरीकरण ४६७ किमी- ९०० काेटी, दौंड-मनमाड दुहेरीकरण २४७ किमी- ४३० कोटी, मनमाड-जळगाव तिसरी मार्गिका- १६० किमी- ३५० कोटी, जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका- २४ किमी - २० कोटी.
मुंबई-दिल्ली १२ तासांत
पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी (एबीआर) गुंतवणुकीतून १५७७ कोटी देण्यात आले आहेत, तर मुंबई-दिल्ली १२ तासांत या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी १३२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत मुंबई विभागातील पश्चिम रेल्वेच्या १२ स्थानकांचा विकास केला जाईल. त्यात अंधेरी, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, चर्नी रोड, दादर, ग्रँट रोड, जोगेश्वरी, लोअर परळ, मालाड, मरिन लाइन्स, मुंबई सेंट्रल, प्रभादेवी यांचा समावेश आहे.
मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासावर ८५० कोटी खर्च केले जाणार आहेत. त्याची निविदा १५ एप्रिलला खुली होईल, तर १५ जूनपर्यंत निविदा निश्चित केली जाणार आहे. अंधेरी, वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि दादर स्थानकाच्या पुनर्विकासाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे.