पाणीपट्टीच्या अभय योजनेला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:21 AM2020-02-13T01:21:42+5:302020-02-13T01:21:47+5:30

तीन महिन्यांनी वाढविली मुदत : थकबाकीदारांना दिली जाणार विशेष सूट

Extending the water tax recovery | पाणीपट्टीच्या अभय योजनेला मुदतवाढ

पाणीपट्टीच्या अभय योजनेला मुदतवाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे लक्ष्य गाठण्यासाठी महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या पाठोपाठ पाणीपट्टी वसूल करण्यासाठी सुरू असलेल्या अभय योजनेची मुदतही आता तीन महिन्यांसाठी वाढविण्यात येणार आहे. त्यानुसार, १५ फेब्रुवारी ते १५ मेपर्यंत थकबाकीदारांना पाणीपट्टी भरल्यास विशेष सूट देण्यात येणार आहे.


जकात कर बंद झाल्यानंतर मालमत्ता कराकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले. मात्र, पाचशे चौ.फुटांच्या मालमत्तांना कर माफ करण्यात आल्यामुळे महापालिकेचे गणित बिघडले आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अवघे दीड महिने उरले आहेत. त्यामुळे मालमत्ता कराचे लक्ष्य गाठण्यासाठी महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदीचा फटका विकास करालाही बसला आहे. यामुळे पालिकेने पाणीपट्टी थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे.


विविध शासकीय, तसेच निम शासकीय आणि काही खासगी कार्यालयांनी जल देयके थकविली आहेत. विविध कार्यालयांकडून महापालिकेला सुमारे दीड हजार कोटी रुपये येणे आहेत. ही रक्कम वसूल करणे, तसेच पाणीपट्टी नागरिकांनी वेळेत भरावी, यासाठी अभय योजना राबविण्यात आली. मात्र, योजनेची मुदत संपुष्टात आली असल्याने प्रशासनाने आता अभय योजनेची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.


एकरकमी अधिदान करणाऱ्याला लाभ
जलदेयकातील जल आकार, मलनिस्सारण आकार आणि जलमापक भाडे यांचे एकरकमी अधिदान करावे, तसेच अभय योजनेच्या कालावधीत आकारण्यात आलेल्या सर्व जलदेयकांचे अधिदान १५ मे, २०२० पूर्वी करणाºया थकबाकीदाराला या योजनेचा लाभ मिळेल.
येथे साधा संपर्क : अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित विभाग कार्यालयातील सहायक अभियंता (जलकामे) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title: Extending the water tax recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.