पोलीस दलातील ७७ हजार अस्थायी पदांना मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 02:04 AM2019-10-11T02:04:18+5:302019-10-11T02:04:31+5:30
पोलीस महासंचालक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या विविध पोलीस घटकांमध्ये शाखा व विभाग आवश्यकतेनुसार स्थापन करण्यात आले आहेत.
मुंबई : राज्य पोलीस दलातील विविध घटकांमध्ये कार्यरत असलेल्या एकूण ७६ हजार ८१२ अस्थायी पदांना मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार पुढील दोन वर्षांसाठी सद्य:स्थितीच्या ठिकाणी पुढील दोन वर्षे कार्यरत राहता येईल. आवश्यकतेनुसार या पदांना मुदतवाढीचा प्रस्ताव देण्यात आल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
पोलीस महासंचालक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या विविध पोलीस घटकांमध्ये शाखा व विभाग आवश्यकतेनुसार स्थापन करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पोलीस व कार्यालयीन पदे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण केली आहेत. गुन्ह्याचा तपास, प्रशिक्षण तसेच कायदा व सुव्यवस्था आदी कारणांसाठी ही पदे बनविलेली आहेत. नवीन पदाच्या निर्मितीला मंजुरी मिळत नसल्याने अस्थायी स्वरूपात ती कार्यरत ठेवली जातात. अशा प्रकारे राज्यभरात एकूण ७६ हजार ८१२ पदे आहेत. त्यांची मुदत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत होती. त्यांची अद्यापही आवश्यकता असल्याने या पदांना आणखी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाने गृह विभागाकडे पाठविला होता. त्याला हिरवा कंदील मिळाल्याने या पदांना आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित घटक कार्यालयाच्या प्रशासकीय वर्गाकडून या पदाच्या पूर्ततेबाबतची कार्यवाही पूर्ण करायची आहे. अन्यथा संबंधित पदासाठीच्या वेतन व अन्य सवलतींपासून वंचित राहावे लागेल.