मुंबई - कोरोनाकाळातील खर्चाने महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे. याचा मोठा फटका उत्पन्नालादेखील बसला. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांत म्हणजे मार्च २०२१ पर्यंत मालमत्ता, पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. यासाठी पाणीपट्टीच्या अभय योजनेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईकरांना आता जलआकाराची थकबाकी मार्च २०२१ पर्यंत भरता येणार आहे.
मुंबईत दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. यासाठी नागरिकांना पाठवण्यात येणाऱ्या बिलांचा भरणा जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्यात अदा करणे बंधनकारक आहे. हे बिल वेळेत न भरणाऱ्या ग्राहकाला दंड भरावा लागतो. बिलात सूट मिळविण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या, अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच होती. गुरुवारी ही मुदत संपुष्टात आली.
मात्र, या योजनेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही योजना आणखी तीन महिने म्हणजे आता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर दरमहिन्याला दोन टक्के आकारणी केली जाते. तरी संबंधित नागरिकांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता अभय योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या प्रलंबित जलदेयकांचे अधिदान लवकरात लवकर करावे, असे आवाहन महापालिकेच्या जलअभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे.
* मुंबईत दररोज ३८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी पाणीपट्टीत आठ टक्के वाढ करण्यात येते.
* मालमत्ताकर, विकासकराबरोबरच जलआकार पालिकेच्या उत्पन्नाचे स्राेत आहे. परंतु, शासकीय कार्यालयांनी पालिकेची सुमारे दीड हजार कोटी रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे.