मुंबई : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्र १ जुलैपासून सुरू होणार आहे. सहा महिन्यांच्या या प्रशिक्षण वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असून, ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणर्थींना वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यात येते. चालू शैक्षणिक वर्षातील सहा महिन्यांचे सत्र १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत पार पडणार आहे. यासाठी दरमहा ४५० रुपये प्रशिक्षण शुल्क आकारले जाते. दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थींना दरमहा केवळ १०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रशिक्षण वर्गासाठी इच्छुकांनी विहीत अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडूरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा येथे दिनांक ३० जूनपर्यंत सादर करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.