व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 04:30 AM2019-06-20T04:30:36+5:302019-06-20T04:30:42+5:30
सीईटी सेल; सेतू केंद्रावरील तांत्रिक अडचणींमुळे घेतला निर्णय
मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी १७ जून, २०१९ पासून सुरू झाली असून, अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट प्रवेशप्रक्रियेच्या नोंदणीसाठी राज्यातील सर्व सेतू केंद्रांवर विद्यार्थी पालकांची गर्दी होत आहे. यामुळे सेतू केंद्रांवर एकाच वेळी पडत असलेल्या भारामुळे सार पोर्टलचे सर्व्हर डाउन असल्याच्या तक्रारी पालक, विद्यार्थी सीईटी सेलकडे मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यानुसार विद्यार्थी हितासाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून देणार असल्याची माहिती सीईटी सेल आयुक्त आनंद रायते यांनी दिली.
मुदत वाढवून देण्याचा विचार सुरू असल्याने, विद्यार्थी आणि पालकांनी शेवटचे नोंदणीचे २ दिवस राहिले, म्हणून घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आवाहनही रायते यांनी केले आहे. यंदा ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीईटी दिली. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची नियमावली तयार करण्यास विलंब झाल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती. ती आता १७ जूनपासून सुरू झाली असून, आतापर्यंत सार पोर्टलवर २ लाख ६३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील २ लाख ७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी निश्चित झाली आहे. यंदा प्रथमच ही प्रक्रिया आॅनलाइन होत आहे. शिवाय एकाच वेळी इतके विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेत सहभागी होत असल्याने, पोर्टल सर्व्हर डाउन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, पुढील दोन दिवसांत ही प्रक्रियाही सुरळीत होईल, अशी माहिती आयुक्त रायते यांनी दिली.
विद्यार्थ्यांचा त्रास वाचणार
अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह अन्य अभ्यासक्रमासाठी सार पोर्टलवर वेगवेगळ्या लिंक आहेत, तसेच नोंदणी करताना तब्बल ६८ प्रकारची कागदपत्रे गोळा करावी लागतात. प्रत्यक्षात कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत गोंधळच आहे़ याची नेमकी माहिती सेतू किंवा संबंधित विभागालाही नाही़ अशा तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत रायते यांनी सांगितले की, विविध पडताळणीसाठी जमा केलेली सर्व प्रमाणपत्रे एकाच वेळी घेऊन, त्यांची एकदाच पडताळणी केल्याने प्रवेशावेळी, तसेच भविष्यात विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रमाणपत्रे जमा करण्याचा त्रास वाचेल.