लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या आणि शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा यंदा २ महिने उशिरा होत असल्याने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर शाळांनी आपली विभागीय मंडळांकडे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत यापूर्वी १५ जानेवारी होती ती आता वाढवून १५ मार्च करण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील सर्व विद्यार्थ्यांची शासकीय रेखाकला परीक्षा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेता येणार नसल्याचे कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे. यास अनुमती द्यावी, असे पत्रही त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा दिली असेल त्या विद्यार्थ्याला त्या आधारावर शैक्षणिक हिताच्या दृष्टीने गुण देण्यात यावेत, अशी मागणी राज्यातील विविध कलाध्यापक संघटनांनी कला संचालनालयाकडे केली आहे. आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुदतवाढऐवजी याबाबतीत निर्णय घेऊन कलागुणांचा तिढा सोडवावा, अशी मागणी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व पालक वर्गातून होत आहे.