पदवी प्रवेशाच्या प्रक्रियेला मुदतवाढ; १४ तासांच्या ऑनलाइन सिनेट बैठकीत विद्यापीठाचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:43 AM2020-08-28T01:43:46+5:302020-08-28T01:44:01+5:30
विद्यापीठामध्ये लवकरच पार्ट टाइम इंजिनीयरिंग कोर्स सुरू करण्याच्या अॅड. वैभव थोरात यांच्या मागणीला कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबई : मंगळवारी झालेली मुंबई विद्यापीठाची आॅनलाइन सिनेट बैठक सलग १४ तास चालून पहाटे ३.४५ला संपली. या बैठकीत सिनेट सदस्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत विद्यापीठाकडून अनेक विषयांवर आश्वासने आणि सकारात्मक प्रतिसाद मान्य करून घेतले. लॉकडाऊनमुळे यंदाची पदवी प्रवेश प्रक्रिया प्रभावित झाली असून प्रवेश समितीच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया आणखी एक महिना वाढवून घेण्याचे महत्त्वाचे आश्वासन यावेळी विद्यापीठाने सदस्यना दिले.
यामुळे अद्यापही प्रवेश न मिळालेल्या पदवी प्रवेशाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आॅनलाइन लेक्चर्सना उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी यूट्युबच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे परिपत्रक दुरुस्त करून प्रत्येक दिवशी तीन ते पाच तासिका घेण्याबाबतची अट शिथिल केली जाईल, असे आश्वासनही कुलगुरूंनी दिल्याची माहिती बुक्टू संघटनेच्या मधु परांजपे यांनी दिली.
सोबतच टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून विद्यापीठ महाराष्ट्र शासनाकडे खास आर्थिक पॅकेज मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आॅनलाइन अधिसभेत कुलगुरूंनी सदस्यांना सांगितल्याची माहिती परांजपे यांनी दिली.
एआयसीटीईचे निर्देश असूनही अनेक महाविद्यालयांमध्ये पगार वेळेत होत नाहीत. म्हणून याबाबत शासनाचे नेमके निर्देश काय आहेत हे शासनाकडून घेऊ आणि शासकीय नियमाप्रमाणे जर फक्त प्राचार्यांचे नावे सॅलरी अकाऊंट काढायचे असेल तर याबाबतचे परिपत्रक विद्यापीठांच्या माध्यमातून लवकरच जारी करणार असल्याचे महत्त्वाचे आश्वासनही कुलगुरूंनी दिले आहे. यामुळे अनेक शिक्षक कर्मचारी यांना दिलासा मिळणार आहे.
विद्यापीठात परत टाइम इंजिनीअरिंग कोर्स
विद्यापीठामध्ये लवकरच पार्ट टाइम इंजिनीयरिंग कोर्स सुरू करण्याच्या अॅड. वैभव थोरात यांच्या मागणीला कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले कल्याण कॅम्पस हे ‘स्कूल आॅफ इंजिनियरिंग’ म्हणून सुरू केले आहे. त्यामुळे या उपकेंद्रामध्ये इंजिनीयरिंगच्या अभ्यासक्रमांवर भर देत नोकरी, व्यवसाय करणाºया व्यक्तींसाठी पार्ट टाइम इंजिनीयरिंग कोर्स सुरू केल्यास त्याचा मोठा फायदा पालिका व मंत्रालयातील अभियंत्यांना होण्याची शक्यता आहे.
ही बाब युवासेना सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी २५ आॅगस्टला झालेल्या सिनेटमध्ये कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. तसेच कल्याण कॅम्पसमध्ये इंजिनीयरिंगचे पार्ट टाइम डिग्री कोर्स सुरू करण्याची मागणी अॅड. वैभव थोरात यांनी केली. या मागणीला कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर पार्ट टाईम डिग्री सुरू करण्यात येईल, असे सांगितले.