Join us

पोर्ट ट्रस्टच्या विकास आराखड्यावर सूचना नोंदवण्यास मुदतवाढ द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 4:08 AM

मुंबई पोर्ट ट्रस्टने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रस्तावित विकास आराखड्यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी २६ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रस्तावित विकास आराखड्यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी २६ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, हा विषय मुंबईकरांच्या दृष्ट्रीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने यासाठी एक महिना मुदत वाढवून देण्याची मागणी पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.या विकास आराखड्यातील विविध विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यासाठी शहरातील पर्यावरणवाद्यांनी काही दिवसांपूर्वी बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये अनेक तज्ज्ञ उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार मुंबई पोर्ट ट्रस्टला हरकती नोंदवण्यात येणार आहेत.याबाबत अधिकाधिक मुंबईकरांना माहिती मिळावी व त्यांनी देखील सूचना व हरकती नोंदवाव्यात यासाठी त्याची मुदत वाढवण्याची मागणी अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक पंकज जोशी यांनी केली आहे.मुंबईत जागा कमी असल्याने असलेल्या जागेचा सुयोग्य वापर होणे पोर्ट ट्रस्ट, मुंबई व महाराष्ट्रासाठी गरजेचे असल्याने याबाबत सखोल चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.>२० वर्षांसाठी ब्ल्यू प्रिंटपुढील २० वर्षांसाठी जाहीर केलेल्या ब्ल्यु प्रिंटनुसार, ट्रस्टच्या मालकीच्या वडाळा ते ससून डॉक येथील ९६६ हेक्टर जमीनीवर विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. विकास आराखड्यामध्ये विविध प्रकल्पांचा समावेश असून त्यामध्ये मोकळी जागा, रिक्रिएशन पार्क, इकॉलॉजिकल पार्क, पर्यटन केंद्रे, रेस्टॉरन्टस, परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प आदींचा समावेश आहे. पूर्व किनारपट्टीला मरीन ड्रईव्ह प्रमाणे बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. विकास आराखड्यावर सूचना व हरकती नोंदवण्यासाठी २६ जानेवारीपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. समुद्रात रिक्लेमेशन करुन त्या ठिकाणी पार्क उभारण्याच्या प्रस्तावाबाबत सखोल अहवाल देण्यासाठी ट्रस्टने सुमारे ६ कोटी रुपये खर्च करुन खासगी संस्थेला कंत्राट दिले आहे. याबाबतचा अहवाल ३१ जानेवारी पर्यंत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.