ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:06+5:302021-05-05T04:08:06+5:30
हसन मुश्रीफ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत महाआवास अभियान (ग्रामीण)ला ...
हसन मुश्रीफ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत महाआवास अभियान (ग्रामीण)ला ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली. राज्यातील पात्र लाभार्थींना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा, तसेच घरकुलासोबतच शासनाच्या इतर योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी हा निर्णय घेतला असून, उर्वरित घरकुलांचे काम गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० पासून सुरू झालेल्या व १ मे २०२१ पर्यंत राबविण्यात आलेल्या या अभियानाची वाटचाल यशस्वीरीत्या सुरू असून, या कालावधीत सुमारे ७ लाख ५० हजार घरकुलांची बांधकामे हाती घेण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ५० हजार घरकुले पूर्ण झाली असून, ३ लाख ९९ हजार घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.
मुश्रीफ म्हणाले की, घरकूल बांधणीबरोबरच लाभार्थींना इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी इतर शासकीय योजनांशी कृतीसंगम करण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ७ लाख १० हजार ७८२ लाभार्थींना शौचालयाचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ४ लाख ७३ हजार ६०५ लाभार्थींना नळाद्वारे पाणीपुरवठा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ३ लाख ७४ हजार ९२४ लाभार्थींना गॅस जोडणी, सौभाग्य योजनेंतर्गत ३ लाख ४८ हजार ०७७ लाभार्थींना वीजजोडणी, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधूनही घरकूल बांधकामासाठी मजुरीच्या स्वरूपात मदत करण्यात येत आहे. याअंतर्गत ४ कोटी ३४ लाख ७७ हजार ९२९ दिवस मनुष्यबळ निर्मिती करण्यात आली आहे.
याशिवाय, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ४ लाख २५ हजार २५५ लाभार्थींना उपजीविका साधनांचा लाभ देण्यात आला आहे. आतापर्यंत २ हजार ३६१ लाभार्थींना विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
..............................