मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रवेश घेतला आहे. एम.ए. राज्यशास्त्र या अभ्यासक्रमासाठी वायकर यांनी प्रवेश घेतल्याची माहिती आयडॉलने दिली. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वायकर यांच्याप्रमाणेच अनेक नामांकित व्यक्तींनी यंदा आॅनलाइन प्रवेश घेतला आहे. त्यात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी एमए इंग्रजीसाठी, तर नगरसेविका राजश्री सुर्वे-पालांडे यांनी एमए समाजशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकार अनिता सलीम यांनी यंदा आयडॉलमध्ये बीएच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांनीही प्रवेश घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यात संजीव कारंडे (६८) यांनी प्रथम वर्ष बीए, शैलजा कुलकर्णी (६५) एमए मराठी आणि नीलम राजगोपालन (६१) यांनी तृतीय वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. >> आयडॉलच्या प्रवेशाला शेवटची मुदतवाढ आयडॉलच्या आॅनलाइन प्रवेशाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रवेश प्रक्रियेत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना १९ ते २३ आॅक्टोबरपर्यंत विलंब शुल्कासह प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. या वर्षीची मुदतवाढीची ही शेवटची संधी असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. ही मुदतवाढ बीए, बीकॉम, बीएससी (कॉम्प्युटर सायन्स, नॉटिकल टेक्नॉलॉजी), एमए, एमए (शिक्षणशास्त्र), एमकॉम (अकाउंटन्स / व्यवस्थापन), एमए/एमएससी (गणित), एमएससी (माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र), पीजीडीएफएम (पीजी डिप्लोमा इन फिनान्शिअल मॅनेजमेंट), पीजीडीओआरएम (पीजी डिप्लोमा इन आॅपरेशन्स रिसर्च मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमांसाठी असेल.
आयडॉलच्या प्रवेशांना मुदतवाढ
By admin | Published: October 16, 2015 2:38 AM