मुंबई: चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली. ही मुदत उद्या २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ देण्यात येत आहे.
सन 2015 ते सन 2019 या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी 2.25 पट अर्ज प्राप्त झाले होते. तथापि, चालू वर्षी कोव्हीड - 19 च्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या फक्त 1.45 पट अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत इच्छा असतानाही कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
१ लाख ४५ हजार जागांसाठी आतापर्यंत 2 लाख 55 हजार अर्ज
आयटीआय प्रवेशप्रक्रीया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यापैकी अमरावती विभागात 17 हजार 984, औरंगाबाद विभागात 19 हजार 244, मुंबई विभागात 19 हजार 948, नागपूर विभागात 28 हजार 136, नाशिक विभागात 29 हजार 500, पुणे विभागात 30 हजार 820 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी 19 ऑगस्टपर्यंत 2 लाख 55 हजार 803 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 लाख 21 हजार 585 विद्यार्थ्यांनी शुल्क अदा कलेले असून त्यापैकी 2 लाख 07 हजार 285 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. यावरून नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 48 हजार 518 विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निर्दशनास येते. प्रवेश अर्ज मोबाईल व्दारे देखिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
दुर्गम व ग्रामिण भागात जेथे इंटरनेट जोडणीत अडचणी आहेत तेथील विद्यार्थी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अथवा अन्यत्र प्रवेश अर्ज भरण्यासाठी जात असतात. तथापि, काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. तसेच एकुण उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त प्रवेश अर्ज अधिक असले तरी काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी वा काही तालुक्यांत उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याचे देखिल निदर्शनास आले आहे. नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अवकाश असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवेश प्रोत्साहन अभियान
आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. दुर्गम व ग्रामिण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपव्दारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीची किंवा प्रादेशिक विभागनिहाय नेमून दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची दक्षता घ्यावी. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:चे जिवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.