Join us  

नूतनीकरणासाठी रिक्षा परवान्यांना मुदतवाढ

By admin | Published: November 11, 2015 2:06 AM

दिवाळीत सलग आलेल्या सुट्या आणि त्यामुळे नूतनीकरणाच्या कामात येणारा अडथळा पाहता नूतनीकरण न झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

मुंबई : दिवाळीत सलग आलेल्या सुट्या आणि त्यामुळे नूतनीकरणाच्या कामात येणारा अडथळा पाहता नूतनीकरण न झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत असलेली अंतिम मुदत ३0 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात येत असल्याची माहिती अपर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी दिली.राज्यातील रद्द व नूतनीकरण न झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे काही अटींवर ३१ आॅक्टोबरपर्यंत नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. नूतनीकरणासाठी मुदत देऊनही त्याला थंड प्रतिसाद मिळाल्याने १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. नूतनीकरण न केल्यास कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेत त्याप्रमाणे कारवाईही राज्यातील आरटीओकडून सुरू करण्यात आली. नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द केले जातील, असा इशाराही देण्यात आला. ११ ते १५ नोव्हेंबरपर्यंत सुट्या असल्याने आरटीओ तसेच परिवहन मुख्यालयही बंद राहणार आहे. यामुळे ३0 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या मुदतीत नूतनीकरण न केल्यास परवाने कायमचे रद्द करण्यात येणार आहेत.