मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) अर्ज भरण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही परीक्षा १७ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. विद्यापीठाने गेल्या आठवड्यापासून पेट परीक्षेचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी पेट परीक्षेचे प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑक्टोबर होती.
पेट परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाने वेळापत्रकही जाहीर केले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि आणखी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ केली आहे. आता ४ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल.पेट परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षार्थींनी ३० मिनिटांपूर्वी केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे.
पेट परीक्षेला ७६ विषय ऑनलाइन पेट परीक्षेसाठी ७६ विषय आहेत. गेल्या पेट परीक्षेत सर्वसाधारण ६ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.