‘आरटीई’साठी मुदतवाढ, पालकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 01:22 PM2023-07-21T13:22:08+5:302023-07-21T13:22:31+5:30
२८ जुलैपर्यंत घेता येणार प्रवेश
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया यादीतील विद्यार्थ्यांच्या तिसऱ्या प्रवेश फेरीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना २८ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेत २० हजार ५९४ जागा अद्याप रिक्त असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात एक लाखाहून अधिक जागा उपलब्धप्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण ३ लाख ६४ हजार ४९३ अर्ज दाखल झाले.
विद्यार्थ्यांचेही प्रवेश सुरूप्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० नियमित आणि प्रतीक्षा यादीतील तीन टप्पे मिळून ३८ हजार २०३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. १३ एप्रिलपासून नियमित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर ३० मेपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली.
राज्यात अजूनही जागा रिक्तच
आरटीई प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत ६३ हजार १८८ नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. (प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या फेरीत १३ हजार ६७६ विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत ३ हजार ५८८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले.) त्यामुळे एकूण ८१ हजार २५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत.