गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी आयोजित विशेष अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
By सचिन लुंगसे | Published: February 15, 2024 02:46 PM2024-02-15T14:46:11+5:302024-02-15T14:46:42+5:30
Mumbai Mill Workers News: म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी सुरू असलेल्या अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई - म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी सुरू असलेल्या अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत १,०८,४९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८९,६४८ अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र/ अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.
म्हाडाकडे यापूर्वी कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने सादर करता यावीत याकरिता वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब जवळील समाज मंदिर हॉल येथे तात्पुरते स्वरूपाचे मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता ९७१११९४१९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणती कागदपत्रे
पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या १३ पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र , तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र , लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे.