गुडन्यूज... अकरावी प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 06:56 AM2022-07-29T06:56:45+5:302022-07-29T06:57:07+5:30
अर्जाचा भाग १ आणि भाग २
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात ११,९३० विद्यार्थ्यांचा अर्जाचा भाग २ भरण्याची प्रक्रिया अद्याप बाकी असल्याने पहिल्या फेरीतील प्रवेशाच्या संधीपासून वंचित राहू नयेत, यासाठी अर्जाचा भाग २ भरून तो सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ दिली असली तरी त्यानंतरच्या कार्यवाहीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्जाचा भाग १ आणि भाग २
राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी - चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २७ जुलै असूनही अद्याप ६ हजार ४१ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग १ भरला आहे. मात्र, तो प्रमाणित झालेला नाही, तर ५ हजार ८८९ विद्यार्थ्यांचा भाग १ प्रमाणित आहे, मात्र त्यांनी अर्जाचा भाग २ भरला नाही, अशी स्थिती आहे.
हे विद्यार्थी नियमित फेरी १मधील प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रवेशाची नियमित फेरी १साठी अर्ज मुदतवाढीचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.
याशिवाय या वाढीव मुदतीमध्ये विद्यार्थ्यांना केवळ अर्ज
प्रमाणित करून घेता येईल आणि अर्जाचा भाग २ भरता येईल. विद्यार्थ्याला नवीन नोंदणी करून भाग १ भरता येणार नसल्याचे अधोरेखित केले आहे.
कोटांतर्गत प्रवेशाबाबत
विद्यालय स्तरावरून प्रवेशासाठी कोटांतर्गत राखीव ठेवलेल्या जागांवरील प्रवेश दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यालय स्तरावरुनच करता येणार आहेत.
त्यासाठी प्रवेशाच्या पोर्टलवरुन कोटांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची नावे विद्यालयांना उपलब्ध केली जातील.
कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविणे व त्यामध्ये बदल करणे कार्यवाही कायम सुरु राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात निवड न झालेले तसेच नवीन पसंती नोंदविलेले विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र असतील, अशा प्रकारे प्रत्येक प्रवेश फेरीसाठी दिलेल्या वेळेत विद्यालयांना कोटाप्रवेश करता येणार आहेत.
कोटांतर्गत प्रवेशात प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तपासून घेणे व नियमानुसार प्रवेश देणे ही जबाबदारी संबंधित विद्यालयांची आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.