Join us  

गुडन्यूज... अकरावी प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 6:56 AM

 अर्जाचा भाग १ आणि भाग २ 

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात ११,९३० विद्यार्थ्यांचा अर्जाचा भाग २ भरण्याची प्रक्रिया अद्याप बाकी असल्याने  पहिल्या फेरीतील प्रवेशाच्या संधीपासून वंचित राहू नयेत, यासाठी अर्जाचा भाग २ भरून तो सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत मुदतवाढ  देण्यात आली आहे. मुदतवाढ दिली असली तरी त्यानंतरच्या  कार्यवाहीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

 अर्जाचा भाग १ आणि भाग २  राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी - चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत.  अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २७ जुलै असूनही अद्याप ६ हजार ४१ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग १ भरला आहे. मात्र, तो प्रमाणित झालेला नाही, तर ५ हजार ८८९ विद्यार्थ्यांचा भाग १ प्रमाणित आहे, मात्र त्यांनी अर्जाचा भाग २ भरला नाही, अशी स्थिती आहे.  हे विद्यार्थी नियमित फेरी १मधील प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रवेशाची नियमित फेरी १साठी अर्ज मुदतवाढीचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय या वाढीव मुदतीमध्ये विद्यार्थ्यांना केवळ अर्ज प्रमाणित करून घेता येईल आणि अर्जाचा भाग २ भरता येईल.  विद्यार्थ्याला नवीन नोंदणी करून भाग १ भरता येणार नसल्याचे अधोरेखित केले आहे.  

कोटांतर्गत प्रवेशाबाबत 

 विद्यालय स्तरावरून प्रवेशासाठी कोटांतर्गत राखीव ठेवलेल्या जागांवरील प्रवेश दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यालय स्तरावरुनच करता येणार आहेत.  त्यासाठी प्रवेशाच्या पोर्टलवरुन कोटांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची नावे विद्यालयांना उपलब्ध केली जातील.  कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविणे व त्यामध्ये बदल करणे कार्यवाही कायम सुरु राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.   पहिल्या टप्प्यात निवड न झालेले तसेच नवीन पसंती नोंदविलेले विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र असतील, अशा प्रकारे प्रत्येक प्रवेश फेरीसाठी दिलेल्या वेळेत विद्यालयांना कोटाप्रवेश करता येणार आहेत.   कोटांतर्गत प्रवेशात प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तपासून घेणे व नियमानुसार प्रवेश देणे ही जबाबदारी संबंधित विद्यालयांची आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :दहावीचा निकालमहाविद्यालय