मुंबई :
इंदू मिल येथे सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामास मुदतवाढ देण्यात आली आहे. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. आतापर्यंत २०९ कोटी रुपये कंत्राटदारास दिले असून इमारतींचे ४९ टक्के तर पादपीठाचे ६ टक्के काम पूर्ण झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत माहिती विचारली होती. प्रशासनाने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, स्मारकाच्या मूळ संकल्पनेनुसार अपेक्षित खर्च ७६३.०५ कोटी आहे. त्यास सुधारित संकल्पनेनुसार १०८९.९५ कोटी रुपये मान्यता दिली आहे. प्रकल्पातील एकूण २०९.५३ कोटी रुपये २३ नोव्हेंबर २०२१ रोजी दिले आहेत. यात मोबीलायझेशन ऍडव्हान्स ३१.६५ कोटी व प्रकल्प सल्लागाराचे शुल्क १२.६८ कोटींचा अंतर्भाव आहे. यात कंत्राटदार शापूरजी पालनजी तर प्रकल्प सल्लागार शशी प्रभू असोशिएट्स आणि डिझाईन असोशिएट्स आयएनसी आहेत.
- सहाय्यभूत इमारतींचे ४९ टक्के तर पादपीठाचे ६ टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मार्च २०२४ पर्यंत कालावधी दिला आहे. - ९ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यादेश जारी झाला असून ३६ महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते.