मुंबई : तीन वर्षांच्या विधि अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात आॅफलाइन प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर होती. मात्र, उच्च न्यायालयाने प्रवेशाची मुदत २२ डिसेंबरपर्यंत वाढवून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.मनाली सावंत या विद्यार्थिनीने विधि अभ्यासक्रमाच्या आॅफलाइन प्रवेशाची मुदत वाढविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती. मनालीला सीईटीमध्ये १५०पैकी ५५ गुण मिळाले. प्रवेश प्रक्रियेचे चार राऊंड पूर्ण झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयांत जागा असतानाही प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली. त्यामुळे मनालीला विधि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता आला नाही. जागा उपलब्ध असल्याने प्रवेश घेण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती मनालीतर्फे ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याचा आदेश सरकारला दिला.मनालीला दिलासामेडिकल व इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम मुदत असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र या दोन अभ्यासक्रमांप्रमाणे विधि अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अंतिम मुदत असावी, असा नियम नाही, असे म्हणत न्यायालयाने मनालीला दिलासा दिला.
आॅफलाइन ‘विधि’ प्रवेशाला मुदतवाढ, २२ डिसेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 1:08 AM