Join us  

आॅनलाइन निविदा प्रक्रियेला मुदतवाढ

By admin | Published: April 23, 2017 3:44 AM

मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीला अजूनही सुरुवात झालेली नाही. यंदा उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासल्या जाणार असल्या तरीही अद्याप

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीला अजूनही सुरुवात झालेली नाही. यंदा उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासल्या जाणार असल्या तरीही अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शनिवारी निविदा प्रक्रिया पूर्ण होणार होती. पण, तीनपेक्षा कमी कंपन्यांचा सहभाग असल्यामुळे निविदा प्रक्रियेला पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठात आधुनिक तंत्रज्ञान आणून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. अनेकदा उत्तरपत्रिका तपासणीत वेळ लागत असल्याने निकाल उशिरा लागतो. त्यामुळे हा उशीर टाळून लवकर निकाल लागावे म्हणून एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्व उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणी होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण पहिल्या वेळी दोनच कंपन्यांनी निविदा भरल्याने शनिवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. पण दुसऱ्यांदाही कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. परीक्षांचे निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अनेकदा खोळंबा होतो. पण यंदापासून आॅनलाइन तपासणीमुळे खोळंबा होणार नाही, अशी आशा विद्यार्थ्यांना वाटत होती. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत आॅनलाइन तपासणी प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांच्या निकालावर आजही टांगती तलवार आहे. शनिवारी प्रक्रिया सुरू होईल अशी विद्यार्थ्यांना आशा होती. पण आता विद्यार्थ्यांना पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.