मुंबई - कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) ८ हजार ९८४ सदनिकांसाठी जाहीर संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या नवीन वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. (Extension for registration of application, submission of application and payment of deposit for MHADA's Konkan Mandal flats lottery)
नवीन वेळापत्रकानुसार इच्छुक पात्र अर्जदारांना सदर संगणकीय सोडतीकरीता ऑनलाइन अर्ज नोंदणी दि. २९ सप्टेंबर २०२१ रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येईल. नोंदणीकृत अर्जदारांना दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन तसेच बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा (EMD) भरणा दि. ०१ ऑक्टोबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येईल.
सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी आता दि. ०४ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in तसेच https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून दावे-हरकती दि. ०५ ऑक्टोबर, २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दि. ६ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी दिली.
संगणकीय सोडतीचा कार्यक्रम यापूर्वी निश्चित झाल्याप्रमाणे दि. १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी १० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस जवळ, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होणार असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. इच्छुक पात्र अर्जदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन कोंकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.