मुंबईतील जलवाहतुकीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
By admin | Published: July 3, 2017 07:03 AM2017-07-03T07:03:45+5:302017-07-03T07:03:45+5:30
महाराष्ट्र सागरी मंडळाकडून (एमएमबी) जलवाहतुकीसाठी मागेल त्याला परवानगी देण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाकडून (एमएमबी) जलवाहतुकीसाठी मागेल त्याला परवानगी देण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वसई खाडी, ठाणे खाडी, बेलापूर (पनवेल) खाडी, मिठी नदी आणि तळोजा नदीसाठी जलवाहतुकीच्या निविदांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असणार आहे.
शहरातील उपनगरीय रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून जलवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वसई खाडी, ठाणे खाडी, बेलापूर (पनवेल) खाडी अणि तळोजा नदीसाठी जलवाहतुकीच्या निविदा खुल्या करण्यात आल्या होत्या.
जलवाहतूक सेवा सुरू करणाऱ्यांना भाडे व फेऱ्या यांचे नियमन करण्याची मुभा संबंधिताला देण्यात आली आहे. कोणत्याही मार्गावर प्रवासी जलवाहतुकीसाठी स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शिवाय जलक्रीडासाठी देखील परवानगी देण्यात येईल. शेवटच्या दिवसापर्यंत एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे मंडळाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. जलवाहतुकीसाठी आवश्यक व प्रवाशांभिमुख ‘प्रस्ताव’ एमएमबीकडे देण्यात यावे. या प्रस्तावासाठी आवश्यक ती मदतही एमएमबीकडून करण्यात येईल.
निविदा न येण्यास कारण की...
जलमार्ग आणि जलक्रीडा या संकल्पना आजही आपल्याकडे रुजलेल्या नाहीत. जलमार्गासाठी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात लागते. मात्र त्याचे फायदे तत्काळ न होता हळूहळू व दूरगामी होतात. जलमार्गाच्या सर्व परवानग्या मिळतील. मात्र प्रत्यक्षात मार्गातील मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. मोठ्या गुंतवणुकीवर तत्काळ नफ्याचा परतावा मिळत नसल्याचे मुख्य कारण असू शकते, असे मत जल वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
प्रवासी जलवाहतूक मार्ग
वसई-विरार-भार्इंदर-कशेळी (ठाणे खाडी)
सीबीडी बेलापूर-मीठबंदर (ठाणे)
मिठी नदी
तळोजा- सीवूड इस्टेट-नेरूळ-खारघर
मुंबई महानगर प्रदेशातील अन्य मार्ग