मुंबई : दक्षिण मुंबईमधील हेरिटेज असलेली एस्प्लनेड मेन्शन ही इमारत रिकामी करण्यासाठी आता ३० मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.ही इमारत न्यायालयाच्या आदेशानुसार १५ मे पर्यंत म्हाडामार्फत रिकामी करण्यात येणार होती. सर्वोच्च न्यायालयाने ३० मेपर्यंत इमारत रिकामी करता येणार नाही, असा आदेश दिला असल्याने म्हाडाची डोकेदुखी मात्र वाढली आहे.गेल्या काही वर्षांपासून एस्प्लनेड मेन्शन ही इमारत अतिधोकादायक इमारतींच्या यादीत येत आहे. ही इमारत खूपच जुनी असल्याने या इमारतीची दुरवस्था झाली आहे. म्हाडाचे मुंबई दुरुस्ती मंडळ ही इमारत रिकामी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, इमारतीतील रहिवाशांनी ही इमारत रिकामी करण्यास विरोध केला असून, न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने १५ तारखेपर्यंत इमारत रिकामी करा, असे आदेश म्हाडाला दिला होता. यानंतर, या इमारतीतील रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्याने ३० मे पर्यंत इमारत रिकामी करू नये, असा आदेश देण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील सुनावणी ४ जूनला होणार आहे, तसेच या इमारतीच्या दुरुस्तीला किती वेळ लागणार आहे आणि रहिवाशांना या इमारतीत पुन्हा केव्हा स्थलांतरित करणार, हे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उच्च दर्जाचे लोखंड परदेशातून आणण्यात येणार आहे.
एस्प्लनेड मेन्शन रिकामी करण्यासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 4:20 AM