मुंबई : तीन दिवसांपासून झालेली अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या इंटरनेट व विजेच्या समस्येमुळे अनेक विद्यार्थ्यांना पदवी प्रथम प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही मुंबई विद्यापीठाने नोंदणी प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली आहे. त्यानुसार, ७ आॅगस्टपासून ते १४ आॅगस्टपर्यंत त्यांना आॅनलाइन नोंदणी करता येईल.
प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी २१ जुलै ते ४ आॅगस्टपर्यंत नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. या मुदतीत नोंदणीपासून वंचित विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने www.mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर ७ आॅगस्टपासून पुन्हा प्रवेश नोंदणी लिंक खुली केली आहे. ती १४ आॅगस्टपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुली असेल. या कालावधीत प्रवेश नोंदणी करणाºया विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी तिसºया गुणवत्ता यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादीत समाविष्ट करून प्रवेश द्यावा, अशा सूचना महाविद्यालयांना विद्यापीठाने दिल्या आहेत. ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल त्या महाविद्यालयाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर महाविद्यालय ाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावा लागेल. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सूचना मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सर्व संलग्नित महाविद्यालयांना दिल्या.